Saturday, January 28, 2012

शाळा

या वर्षातल पण केल्याप्रमाणे लगेच दुसरं पुस्तक उचललं. शाळा. नववीतल्या जोशीने वर्णन केलेल्या त्याच्या चालू वर्षातल्या घडामोडी. शाळेवर पुस्तक लिहायला अतिउत्तम वर्ष ते. त्या वर्षी शाळेत जे काही घडतं ते किंबहुना कुठल्याच इयत्तेत घडत नाही. लेखकाने अतिशय साध्या आणि स्वच्छ शब्दात संपूर्ण वर्ष रेखाटल आहे. पुस्तक वाचताना कितीतरी वेळा नकळत आपण हसत असतो. अर्थात, तुम्ही सुद्धा तशाच शाळेमध्ये गेला असाल तरच. माझी शाळा तर अगदी अशीच होती. शाळेत साजरे होणारे उत्सव, वक्तृत्व स्पर्धा, त्यात पुढे-पुढे करणारे विद्यार्थी, घोकंपट्टी करून पोपटपंची करणारे, शाळेच्या hall मध्ये होणारे कार्यक्रम, तिथे होणारी टिंगल टवाळी, त्यात एखादा तरी गाववाला असणं, ऑफ पिरेडला केलेली धम्माल, सिनेमांच्या भेंडया, सिनेमाची गाणी तोंडीपाठ असणं, एकमेकांना आडनावाने हाक मारणं, कॅम्प मधली मस्ती, मुलंमुलींनी एकमेकांशी न बोलणं, आणि सहलींमध्ये सर्वकाही विसरून एकदम खुलून गप्पा मारणं, मुलींनी स्वतःलाच हुशार समजणं आणि मुलांनी त्यांना बावळट, शिक्षकांकडून पट्ट्या खाणं, मुख्याध्यापकांची भाषणं सगळं काही अगदी जसंच्या तसं. बऱ्याचदा तर वाटलं आपल्याच वर्गातल्या कुणीतरी लिहलं असावं हे पुस्तक.

शाळेत असताना मी जोशीने म्हटल्याप्रमाणं भावमारू लोकांच्या किंवा त्या चिमण्या मुलींच्या category मध्ये मोडत होते. सरांनी प्रश्न विचारला की त्या चिमण्यासारखाच मी-मी करताना तेव्हा खूप उल्हास वाटायचा. आता ते आठवून खूप हसूही आलं आणि ओशाळल्यासारखंही वाटलं. किती वेडे असतो ना आपण!
पण मला बाकी सगळ्या category मधल्या मुलांचं जगही तितकंच शुद्ध दिसत होतं. फक्त त्या जगात वावरायची हिंमत आणि इच्छा दोन्ही नव्हती. इंजिनियरिंग कॉलेज मध्ये मात्र इच्छा आणि हिम्मत दोन्ही आल्यामुळे मी तेही जग अनुभवता आलं. अर्थात, प्रत्येक जगाचे फायदे-तोटे आणि गंमत वेगळीच असते.

खरं तर हे पुस्तक त्या छोट्याशा जोशी च्या प्रेमकहाणी भोवती घुमतं. पण त्यातही खूप मज्जा वाटते. त्या कोवळ्या, अज्ञान वयात प्रेम झालं म्हणून खूप मोठं झाल्यासारखं त्याचं वागणं पाहून गंमतच वाटते.
पुस्तक तुम्हाला जमिनीला खिळवून बसवत याला आणखी एक कारण म्हणजे त्यात सर्वांना त्यांना लावलेल्या विशेषणानीच संबोधलं आहे. त्यामुळे ते पुस्तक अगदी आपलंसं करून जातं.
पुस्तकाचा शेवटही अगदी योग्य आहे. मात्र तो वाचताना हलकासा चटका लागून गेल्याशिवाय राहत नाही.
जो कुणी मराठी शाळेत गेलाय त्याने एकदा तरी जे पुस्तक वाचून बघावं. बघावं, काही आठवतंय का ते!

2 comments:

Avadhut Gadre said...

Excellnt review Pranali. A superb book. You can check my review at http://avadhutrecommends.wordpress.com/2012/02/18/shala-milind-bokil/

ujwalkhairnar25 said...

खूपच छान वर्णन केले आहे पुस्तकाचे.